कोल्हापूर, (दि.25 ऑक्टोबर) : यंदाच्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं अद्याप बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील प्रमुख मंदिरांनी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसारच यंदा तुळजाभवानी, अंबाबाई, सप्तश्रृंगी, रेणुका देवीचा उत्सव साध्या पद्धतीनं पार पडला. अष्टमीनिमित्त कोल्हापुरात अंबाबाईची नगरप्रदक्षिणा साधेपणाने पार पडली. अष्टमीला अंबाबाई शहरवासियांच्या भेटीसाठी बाहेर पडते अशी अख्यायिका आहे. ही परंपरा सर्व नियमांचे पालन करुन यंदाही जपण्यात आली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या पालखीची दरवर्षी अष्टमीला नगरप्रदक्षिणा होते. यावेळी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. पालखी मार्गात आकर्षक रांगोळी, विद्यूत रोषणाई केली जाते. भालदार, चोपदारांसह शाही लवाजम्यात ही नगरप्रदक्षिणा पार पडते.
परंतु यावर्षी मात्र मात्र एका सजवलेल्या ट्रॅक्टरमधून देवीच्या पालखीची प्रदक्षिणा पार पाडण्यात आली आहे. ठराविक श्रीपूजक, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि मोजके भाविक असं मर्यादित स्वरुप यंदाच्या नगरप्रदक्षिणेला होतं. भाविकांनी गर्दी करु नये म्हणून पालखी मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
