उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 04.30 वाजता श्रीं ची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 05.00 वाजता श्री साईबाबांच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य दिलीप स्वामी यांनी वीणा आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला.
मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी प्रथम, तदर्थ समितीचे सदस्य दिलीप स्वामी यांनी व्दितिय, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तृतिय, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी चौथा व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरात रिती रिवाज पुर्ण करण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.संगिता बगाटे यांच्या हस्ते श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली, दुपारी ०४.०० वाजता किर्तन झाले तर सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती झाली. रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती झाली. तर रात्रभर श्री साईसच्चरित अखंड पारायण व्दारकामाई मंदिरात सुरु होते.
