नगर, (दि.07 ऑक्टोबर) : श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील सावकारविरुद्ध सहायक निंबधक कार्यालयात तक्रार दिली होती. मात्र, सदर सावकाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी, श्रेणी 1 (वर्ग -3) बापुसाहेब खंडेराव शिवरकर (वय 48) याने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले.
माहिती अशी की, सावकाराविरोधात कारवाईसाठी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी 1(वर्ग 3) बापुसाहेब खंडेराव शिवरकर,(वय 48 वर्षे, रा.फ्लॅट नं - 24, धनश्री अपार्टमेंट, स्टेशन रोड, श्रीगोंदा, जि नगर) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने एका सावकाराविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून त्या सावकाराविरुध्द कारवाई करण्याकरिता लागणारे खर्चाचे नावाखाली सहकार अधिकारी यांने लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीवरून दि.29/09/2020 रोजी आयोजित लोकसेवक यांनी पंचा समक्ष रुपये 10 हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आरोपी विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दिपक कारंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
