अपघाताची मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू टँकर (क्र.एमएच.46, एफ.4423) चालक हा धुळेहून सोयाबीनचे वीस टन कच्चे तेल घेवून संगमनेरकडून पुणेच्या दिशेने चालला होता.
हा टँकर शुक्रवारी पहाटे पाच वाजण्यच्या सुमारास नवीन माहुली एकल घाटात आला असता त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पोने (क्र.एमएच.42, टी.2179) टँकरला पाठीमागून धडक दिली. यामुळे टँकरला दोन ठिकाणी मोठ्या चिरा पडून तेल महामार्गावर वाहू लागले.
तेलाच्या टँकरला पाठीमागून आयशर टेम्पोने दिलेली धडक एवढ्या जोराची होती कि, यामुळे महामार्गावर अंदाजे दहा हजार लिटर तेलाचा सडा पडल्याचे चित्र दिसत होते. तर या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर तेल गळती झाल्याने टोलनाक्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.
