नगर, (दि.23 ऑक्टोबर) : देशातील पहिली कामगार संघटना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 साली मुंबईत झाली होती. या देशव्यापी कामगार संघटनेचे हे शताब्दी वर्ष असून, वर्षभर विविध उपक्रमांनी साजरे झाले.
या शताब्दीवर्ष कार्यक्रमाची सुरूवात मुंबई येथे भव्य उद्घाटन समारंभ होऊन झाली. यावेळी देशभरातील आयटक संलग्न शेकडो कामगार संघटनांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी देशातील मध्यवर्ती प्रमुख इंटक, सिटू, एचएमएस यांच्यासह प्रमुख दहा कामगार संघटनांचे नेते मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. देशभर विविध उपक्रम, कार्यशाळा, कामगारांना मार्गदर्शन शिबरे, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी राबवुन शताब्दी वर्ष साजरे केले गेले.
त्याचा समारोप कार्यक्रम देशभर 31 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. या निमित्त अहमदनगर येथे आयटक संलग्न सर्व कामगार संघटनांच्या वतीने आयटक स्थापनेच्या शताब्दीवर्ष समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील तोफखाना येथील आयटक केंद्र, लाल बावटा विडीकामगार युनियन कार्यालय येथे सकाळी 10 वाजता झेंडा वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. यावेळी जेष्ठ कामगारांचा गौरव करण्यात येणार असून, आयटकच्या कामगार चळवळीतील योगदानाबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी समविचारी असलेल्या सिटु, इंटक, सर्व श्रमिक संघ, हमाल पंचायत, सरकारी कर्मचारी संघटना यासह संघटनांच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.अंबादास दौंड, कॉ.भारती न्यालपेल्ली, कॉ. रामदास वागस्कर, कॉ.भैरवनाथ वाकळे, कॉ.सतीश पवार आदींने केले आहे.
