शेवगाव, (दि.30 सप्टेंबर) : वाहतूकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणार्या टोळीला लोणार (जि. बुलढाणा) पोलिसांनी शेवगावात येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यानंतर सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातून तिघाजणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी अंबादास राधाकिसन सानप (वय-36, रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) याच्यासह सहआरोपी योगेश आबासाहेब बोडखे (वय-36), गणेश भिमराव निकम (वय-35, दोघे रा. शेवगाव) या तिघा जणांना लोणार पोलिसांनी अटक केली आहे.
सानप याने वाशिम येथील एका हॉटेलमधून मोबाईल फोन चोरून चिखली येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाला चोरलेल्या मोबाईलवरून संपर्क साधत ‘माझी गाडी मोकळी आहे, भाडे असल्यास सांगा’ असा फोन केला. संबंधित ट्रान्सपोर्ट मालकाने सानप यास चिखली येथून नागपूर येथे सोयाबीन घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानुसार सानप याने 3 जानेवारी 2020 रोजी सुमारे 11 लाख 5 हजार रूपये किंमतीचे 257 क्विंटल सोयाबीन त्याच्या ट्रकमध्ये भरून नागपूरकडे घेऊन न जाता थेट शेवगाव येथे आणला. तो एका व्यापार्याला विकला. याबाबत 10 जानेवारीला लोणार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सानप याच्या विरोधात वाशिम येथे ही गुन्हा दाखल आहे.
