कोविड-19 मध्ये डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे : आयुक्त श्रीकांत मायकलवर

नगर,( दि. 01 जुलै ) : कोणताही आजार असेल, तर पहिली धाव डॉक्टरांकडे असते. डॉक्टर हा समाजाचा कणा आहे. आज संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. हे संकट वाढेल किंवा थांबेल याची शाश्‍वती नाही. परंतु त्याला प्रतिबंध करण्यासाठीची महत्त्वाची भूमिका डॉक्टर्स व कोरोना योद्धे बजावत आहेत,असे प्रतिपादन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.

एशियन नोबल हॉस्पिटल, रोटरी मिडटाऊन व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर डे निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘नोबल’चे डॉ. बापूसाहेब कांडेकर, विजय निकम, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ.सागर झावरे, सचिव डॉ.सचिन वहाडणे, क्लबचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, राहुल हिरे, विजय इंगळे, सतीश शिंगटे, हेमंत कराळे, तरनजित नारंग, जालिंदर शिंदे, प्रशांत अमरापूरकर, ओंकार कुलकर्णी, अभय राजे आदी उपस्थित होते.

मायकलवार पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या सहकार्यामुळे नगरची परिस्थिती चांगली आहे. अतिशय प्रामाणिकपणे सर्व मंडळी काम करीत आहे. कोविडची जबाबदारी डॉक्टरांवर आहे. परिस्थिती अवघड असली तरी समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहोत. निश्‍चितच आपण यावर मात करू. डॉक्टर मंडळी सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करीत आहेत. डॉक्टरांना मी शत शत कोटी प्रणाम करतो व त्यांचे मनापासून आभार मानून आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक घटकाला डॉक्टर डे निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी नोबल हॉस्पिटलचे डॉ.बापूसाहेब कांडेकर म्हणाले की, कोरोनामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. आपण रक्तदान करून रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले पाहिजे. गेल्या तीन महिन्यांपासून आपण सर्वजण सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहोत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार सहकार्य करून कोरोनावर मात करू शकतो, असे ते म्हणाले.

यावेळी रोटरी मिडटाऊनचे सचिव दिगंबर रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोविड 19 मध्ये काम करणार्‍या डॉक्टरांचा प्रशस्तिपत्र देऊन आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन विजय निकम यांनी केले, तर आभार आयएमएचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post