मनपा कर्मचार्‍यांना मारहाण : कामबंद आंदोलन


 मनपा कर्मचार्‍यांना मारहाण : कामबंद आंदोलन 

सुरक्षेची हमी मिळेपर्यंत महापालिकेची अत्यावश्यक सेवा बंद

कामगार युनियनचा निर्णय : अध्यक्ष अनंत लोखंडे  यांची माहिती

नगर (दि.02) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीचा महानगरपालिका कामगार संघटनेने तीव्र शब्दात निषेध केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत तसेच मनपा कर्मचार्‍यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

बुधवारी रात्री उशिरा नागापूर परिसरात महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ व अविनाश हंस या दोघांना शिवसेनेच्या नगरसेवकाच्या नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका कामगार संघटनेचे  अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात संचारबंदी लागू असतानाही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दारू पिऊन फिरत आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या  कर्मचार्‍यांना मारहाण करीत आहेत. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मारहाण करणार्‍यांची पापर्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे.

शहर अभियंत्यांवर बूटफेक प्रकरणातही हेच आरोपी होते. पोलिसांकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली. मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये कलम 144 चे उल्लंघन करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे वाढवावेत. मनपा आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी व जिल्हाधिकार्‍यांशी यासंदर्भात चर्चा करावी आदी सूचना करून कर्मचार्‍यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत अत्यावश्यक सेवा बंदच राहतील, असा निर्णय घेतला असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post