नगर, दि.१८- अहमदनगर जिल्हयातील वृत्तपत्रे व मासिके यांचे द्वार वितरण करण्यास दिनांक 03 मे, २०२० रोजी पर्यंत प्रतिबंध असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
ज्याअर्थी, राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहे.कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्र घरोघरी वितरणासाठी देण्यात आलेले ओळखपत्र आता रद्द समजण्यात यावेत, असे जिल्हा माहिती कार्यालयाने कळवले आहे.
