नगर- देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून नुकताच जिल्ह्यात या विषाणूने बाधित एक व्यक्ती सापडला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने राजपत्र जाहीर करीत सर्जिकल मास्क व हँड सॅनिटायझर या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंच्या सुचित समावेश केला असून या वस्तूंची अवैध साठा करणे किंवा काळ्याबाजाराने त्याची विक्री करताना कोणतीही व्यक्ती अगर संस्था आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या उपभोक्ता प्रकरणे, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने १३ मार्च रोजी या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली. केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ अंतर्गत कलम दोन क उपकलम दोननुसार मास्क व हँड सॅनिटायझर या वस्तूचा जीवनावश्यक वस्तू - २०२० मध्ये समवेश करण्यात आला. हा अधिनियम १३ मार्चपासून देशभर लागू करण्यात आला. सदर अधिसूचना शासकीय राजपत्र काढल्याच्या अर्थात १३ मार्चपासून ३० जून २०२० पर्यंत लागू राहणार आहे.
जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या शेड्यूल सिरियल सातनंतर या वस्तूंचा समावेश करण्यात आला. केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार मास्क व हँड सॅनिटायझर या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करण्यात आल्याने कोणीही या वस्तूंचा काळाबाजार करताना आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायद्यानुसार फौजदारीची कारवाई होऊ शकते, असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
