पंचनामे करा अन्यथा सामूहिक आत्मदहन


 कोरोनामुळे चिकन व अंडी उत्पादन अडचणीत 

आठ दिवसात पंचनामे करा अन्यथा सामूहिक आत्मदहन 

नगर  : कोरोना या रोगाने चीनमध्ये थैमान घातले असून त्याचा परिणाम जिल्हयातील शेतकरी व पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. नगर जिल्ह्यातील चिकन व अंडी उत्पादित करणार्‍या पोल्ट्री व्यवसायिक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोल्ट्री व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना निवेदन सादर करुन आठ दिवसात पंचनामे झाले नाहीत तर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी बाबासाहेब हारदे, अभिषेक खंडागळे, सचिन भोंगळ, डॉ.महेश उड्डे, उमेश बनकर, विजय लांडे, सचिन मुचगुले, राजेंद्र वर्पे, शिवाजी शिंगोटे, सय्यद अली, बाळासाहेब लहाने, अरुण शेटे, मधुकर काळे, सोमनाथ तनपुरे, मच्छिंद्र कोकणे, भिमराव मोरे, अमोल चव्हाण, संदीप कोकणे, सुनील तनपुरे, रत्नदीप कांबळे, शकील शेख, किशोर पवार, जीवन वाघ, सुनील कुदळ आदींसह पोल्ट्री फार्म व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चीनमध्ये कोरोना सारख्या असाध्य रोगाने थैमान मांडले आहे त्याचाच परिणाम म्हणून पोल्ट्रीमध्ये उत्पादित चिकन व अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होतो अश्या प्रकारच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडलेला आहे. दिवसेंदिवस या व्यवसायातील मंदीमुळे विक्रीचे भाव दररोज खाली येत असल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अगोदरच शेती हा व्यवसाय नुकसानीत येत असल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेला आहे. मात्र आता कोरोनाच्या अफवेमुळे तो देखील संकटात सापडला आहे.

चिकन व अंडी उत्पादित करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोल्ट्री फार्मचे 8 दिवसांमध्ये तात्काळ पंचनामे करून सर्व पोल्ट्री फॉर्म चालकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याची व्यवस्था करावी प्रतिपक्षी किमान होणारे खर्च 200 ते 250 रुपये पर्यंतची आर्थिक मदत देण्यात यावी व होणारी पोल्ट्री व्यवसायिकांची आर्थिक हानी व जीवित हानी टाळावी त्याच्या प्रमाणे फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल माध्यमातून काही व्यक्तींकडून पोल्ट्री व्यवसाय संदर्भात चुकीच्या अफवा पुरविल्या जात आहेत अशा व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा पंचनामे करून मदत न दिल्यास सर्व पोल्ट्री धारक व्यवसायिक सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post