नागरिकांच्या प्रदूषणविरहित प्रवासाचे केंद्र सरकारचे स्वप्न: नितीन गडकरी

 नागरिकांच्या प्रदूषणविरहित प्रवासाचे केंद्र सरकारचे स्वप्न: नितीन गडकरी

मुंबई (दि.14) : देशात पर्यावरणाचा र्‍हास होत असून, त्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टी करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे आणि तसे प्रयत्न सुरू आहेत. युवा शक्ती इंजिनीयरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरत असून तरुण पिढी क्रांती करू पाहत आहे. ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांच्या प्रदूषणविरहित प्रवासाचे केंद्र सरकारचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनुसार काम करत आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

भारतातील पहिल्या इंटरसिटी इलेक्ट्रिक बसचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अंधेरी पूर्व द ललित हॉटेलच्या प्रांगणात शुक्रवारी दुपारी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई, पुणे मुंबई असाही बस प्रवास करणार आहे, याचा आपणांस आनंद आहे. सुरुवात चांगली झाली की पुढील कार्य सोपे होते, असे म्हणून त्यांनी या बस सेवेचे स्वागत केले. आपण परदेशातून इंधन खरेदी करत आहोत. वर्षाला आपल्याला 7 लाख कोटी रुपयांचे इंधन लागते; परंतु अन्य मार्गाचा पर्याय खुला होत नसल्याने त्याचा अवलंब आपल्याला करावा लागतो. गेल्या 4 वर्षापासून माझ्या मनात इलेक्ट्रिक बसचा विचार घोळत होता. त्याची सुरुवात केली, मात्र असा प्रवास सुखकर आणि मोठया प्रमाणात व्हायला थोडा वेळ लागेल, अशी कबुली गडकरी यांनी दिली. या बसचा प्रवास जरा महाग आहे; परंतु बसची संख्या वाढल्यानंतर तिकिंटांचे दर कमी केले जातील, असे ते म्हणाले. वाहतूक क्षेत्रात मोठया प्रमाणात बदल होत असून आपण बदलणा-या परिस्थितीशी जुळवून घेत विकास करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवेचे प्रदूषण कमी करण्याचे स्वप्न पाहिले असून लोकांचा हवा प्रदूषणरहित प्रवास व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक राज्यांनीही केंद्र सरकारच्या योगदानाला साथ दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तरुणाई अभियांत्रिकी क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. त्याचा देखील देशाला चांगला लाभ होईल, असा आशावाद देखील त्यांनी जोपासला.

ई-हायवे बनविण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी आपण लवकरच स्विडनच्या दौ-यावर जात आहे. तेथील अभ्यास आणि परिस्थिती पाहून आपल्या देशात तसा प्रयोग राबविला जाईल. मात्र यासाठी काही वेळ लागेल; परंतु अशा टेक्नॉलॉजी भारतात आल्या, तर देशाच्या प्रगतीत आणखी भर पडेल, असे ते म्हणाले. प्रसन्ना परपल मोबॅलिटी सोल्युशन प्रा. लि. ने ही इलेक्ट्रिक बस बनविली असून, त्यांना या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्धल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या कंपनीचे महाव्यवस्थापक प्रसन्ना पटवर्धन यांनी आपल्या भाषणात गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला आणि ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग बनविला आणि त्याच मार्गावरून आपण या इलेक्ट्रिक बसच्या प्रवासाचा आरंभ केला, याचे मला समाधान वाटते असे ते म्हणाले. आपण या क्षेत्रात मिळकतीपेक्षा सामाजिक भावना आणि पर्यावरणपूरक कामावर लक्ष देत असल्याने त्याचे आपणास समाधान वाटते, असे ते म्हणाले. अंकित संघवी यांनी देखील प्रवााशांना चांगली सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असून जसा प्रतिसाद वाढेल, तसे आपण यात आणखी सुविधा देऊन प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रिक बसची वैशिष्टये

 बस 12 मीटर लांब असून टू बाय टू चे कोच आहेत.

 बसमध्ये 43 प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.

 एकदा बॅटरी चार्ज केली की, बस 300 कि.मी.चे अंतर कापते.

 मुंबईते पुणे दरम्यान कंपनीने बॅटरी चार्ज केंद्र उभारले आहे.

  बॅटरीची क्षमता 5 लाख कि.मी. बस चालेपर्यंतची आहे.

 बसची किंमत 1 कोटी 75 लाख असून सर्व सुविधायुक्त आहे.

 बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान 90 मिनिटे लागतात.

 अन्य बसचा प्रति कि.मी. 22 ते 25 रुपये खर्च येतो, पण या बसचा 7 ते 8 रुपये प्रति कि.मी. खर्च येतो.

 इलेक्ट्रिक बस 0 टक्के प्रदूषण आहे.

 स्कॅनिया आणि शिवनेरीच्या तुलनेत तिकिटांचे दर असणार आहेत.

 एका बसमध्ये 4 कॅमेरे असून व्हायब्रेशन व आवाजरहित बस आहे.

 मुंबईत दोन बसची सेवा सुरू केली आहे. अजून एक येणार आहे.

 दक्षिण भारतात येत्या तीन महिन्यांत ही सेवा सुरू केली जाणार आहे.

 ही बस 100 कि.मी. प्रति तास वेगाने धावते.

Post a Comment

Previous Post Next Post