नगर (दि.17) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.19 फेब्रुवारी 2020 रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी जिल्हयात विविध ठिकाणी अभिवादन, मिरवणुक, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जयंतीचे औचित्य साधुन शहरामधुन सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा ध्वज उभारावा तसेच घरासमोर रांगोळी काढावी व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावे. सदभावना रॅलीत सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इथापे यांनी केले. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, शाहु महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, मदर तेरेसा आदींच्या वेशभुषा साकारून रॅलीत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरूवात होणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना अभिवादन करून ही रॅली मार्केट यार्ड चौक, माळीवाडा, बंगाल चौकी, हातमपुरा, तेलीखुंट, चितळेरोड, दिल्लीगेट, नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोड, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग, श्रीराम चौक, शिलाविहार, गुलमोहोर रोड, मिस्किन मळा, तारकपूर, लालटाकी मार्गे रॅली येऊन चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून रॅलीची सांगता होणार आहे, असे इथापे यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
