महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे



महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे

मुंबई (दि.14) : महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मा. पाटील बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या,  प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रवक्ते गणेश हाके , विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते.

मा. पाटील यांनी या वेळी राज्य परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. या परिषदेत राज्य सरकारच्या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने आंदोलन कार्यक्रम २५ रोजी करण्याचे ठरविण्यात आल्याचे मा. पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही मा. पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post