नगर (दि.13) : घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना कोपरगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. या कारवाई दरम्यान टोळीतील अन्य 7 जण फरार झाले. ही कारवाई कोपरगाव पोलिसांनी बुधवारी (दि.12) चासनळी शिवारात ब्राह्मण नाल्याजवळ रात्री 12 च्या सुमारास केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव पोलिस पेट्रोलिंग गस्त करीत असताना त्यांना चासनळी शिवारातील ब्राह्मण नाल्याजवळ अंधारात काही इसम संशयितरित्या दबा धरून बसलेले आढळुन आले. पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला असता दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र अन्य 7 जण फरार झाले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये शरद गोटीराम फुलारे (वय-22, रा. पोहेगाव), जानु उर्फ अनिल ओपीन पिंपळे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडुन पोलिसांनी विना नंबरच्या 3 मोटारसायकल, लोखंडी कोयता, लाकडी दांडके, सुती दोरी, मिरची पावडर असा 60 हजार 130 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाई दरम्यान भुरज्या गोपाळ पिंगळे (वय-20, रा. सुरेगाव, कोपरगाव), संतोष मुन्शी चव्हाण, शरद ओपीन पिंगळे, तोलाराम विठ्ठल पिंगळे, बाबु बाबडी पिंगळे, ताईमाई ताराचंद काळे, किरण छगन सोनवणे (सर्व रा. दत्तनगर, ता. कोपरगाव) हे पसार झालेक.
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी पो.कॉ. दिगंबर कोळी यांच्या फिर्यादीरून भारतीय दंड विधान कलम 399, 402 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
Tags:
Ahmednagar
