पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण,अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 
मुंबई, दि. २ : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला आवश्यक असणारे जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्वीकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले.
या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.
संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post