भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
। मुंबई । 18 फेब्रुवारी 2026 । बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली.
फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते भारतामध्ये एअरबस एच125 हेलिकॉप्टरसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्यासह दोन्ही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे संबंध विश्वासावर आधारित आहेत. फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला अभूतपूर्व गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ही भागीदारी केवळ धोरणात्मक नसून जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठीची भागीदारी ठरेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
