| संगमनेर | दि.21 जानेवारी 2026 | महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (महा-राकावि) च्या अंतर्गत वैद्यकीय प्रतिपूर्ति अधिकारी, नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या क्षेत्रीय कार्यालय, नाशिक यांनी 04 जून 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की संगमनेर येथे सुमारे 10,000 विमाधारक लाभार्थी असल्याची नोंद आहे. सदर भागातील या सर्व लाभार्थ्यांना आरोग्य सेवा सुलभ व तत्काळ उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र सेवा दवाखाने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. या दवाखान्यामुळे विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना स्थानिक पातळीवरच त्वरित व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याची पूर्वआवश्यकता पूर्ण होईल.सदर प्रस्तावास मान्यता देऊन संगमनेर येथील सेवा दवाखाने लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरांमध्ये स्वतंत्र महिला हॉस्पिटल करता पाठपुरावा करण्यात आला आहे याचबरोबर नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बंद दवाखाने महाल व न्यू सेक्टर येथील ही वैद्यकीय सुविधा आमच्या क्षेत्रातील लोकांसाठी पुन्हा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारकडे सातत्याने आग्रह धरला होता. आमच्या या पाठपुरावाला आज यश मिळाले आहे.
