। अहिल्यानगर । 12 सप्टेंबर 2025 । अहिल्यानगर शहरात १५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. पावसाच्या अखंड माऱ्याने रस्ते तळ्यांमध्ये बदलले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारपेठेतील अर्बन बँकेसमोरचा जुना वाडा पावसामुळे कोसळला, शहरातील अनेक जुने वाडे धोकादायक स्थितीत असल्याचे उघड झाले आहे.
दिल्लीगेट, चितळे रोड, माळीवाडा, बाजारपेठ, नवी पेठ आणि सावेडी उपनगरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात अडकली. काही भागांत झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले, ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत १५ आणि १६ सप्टेंबरसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले. शहरात रात्री १२:३० पासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी भरलेल्या काही शाळा सोडण्यात आल्या, तर बहुतांशी शाळांना सुट्टी देण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा नागरिक करीत असून, पावसामुळे उद्भवलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी होत आहे.
