वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांचा शिवसेनेत प्रवेश
अहिल्यानगरातील राजकारणात नवे समीकरण
। अहिल्यानगर । 22 सप्टेंबर 2025 । वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी अखेर शिवबंधन हाती बांधत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली बारसे यांनी मुंबईतील मातोश्री येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताच शहरातील राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि शहर प्रमुख किरण काळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याची भावना होताच हा निर्णय घेतल्याचे प्रतीक बारसे यांनी स्पष्ट केले. त्यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अनुसरून आजवर आंबेडकरी चळवळीत कार्य केले असून, त्यांचा पक्ष प्रवेश हा शहरातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रतीक बारसे हे दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांना तत्काळ मदतीला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे किरण काळे यांची शहरातील ताकद अधिक बळकट होणार असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या पक्षप्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते विनायक राऊत, शहर प्रमुख किरण काळे, अनिस चुडिवाल, सुनिल भोसले, विलास उबाळे, ओंकार वडे, अभिषेक बारसे, धरम परदेशी, प्रविण पवार, अमोल कारंडे, नदीम शेख, अंबादास सोले, सचिन वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

