समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण
| मुंबई | दि.25 सप्टेंबर 2025 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे.
कै. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठीचे योगदान सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी मोठा लढा दिला. मराठा समाजासाठी बलिदान दिले असेल तर ते अण्णासाहेब पाटील यांनीच दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे. या माध्यमातून अण्णासाहेबांच्या चळवळीला हातभार लावण्याचे काम या सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.
