। अहिल्यानगर । दि.11 जुन 2025 । वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंगसाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना तोफखाना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ धागे यांच्या आदेशानुसार शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या अंतर्गत तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.
दिनांक 10 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता नामदेव चौक भागात पेट्रोलिंग करताना दोन संशयित इसम Shine कंपनीच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून फिरताना दिसले. त्यांनी हेल्मेट घालून चेहऱा झाकलेला होता आणि हालचाली संशयास्पद होत्या. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींची नावे समोर आली – गुलाब शेख (वय 38, पंढरपूर) व अमर कांचले (वय 29, नेवासा). त्यांच्याकडे कसून तपास केला असता, त्यांनी एक महिन्यापूर्वी गुलमोहर रोड परिसरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, दोन हेल्मेट व मोबाईल असा ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गु.र.क्र. 465/2025 अन्वये BNS कलम 309(4), 55 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उ.नि. शैलेश पाटील करीत असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोनि आनंद कोकरे, पोसई शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील अंमलदारांनी केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. प्रशांत खैरे व श्री. अमोल भारती यांचेही मार्गदर्शन लाभले.