मराठा आंदोलक, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता जामखेड तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय द्वेषातून मराठा समाजावर प्राणघातक हल्ले केले जात आहेत.
त्यातूनच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेला चार दिवस उलटूनही मुख्य आरोपी आणि राजकिय मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट आहेत. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. आरोपींना राजकीय वरदहस्त देणार्यांना व केजच्या पोलिस निरिक्षक व उपनिरिक्षक यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावे. सदर केस विशेष सरकारी वकील नेमून, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार रविराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
