महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

। मुंबई । दि.01 ऑगस्ट  2023 महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी काढले.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नवले, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रथम महसूल विभागाकडे जबाबदारी दिली जाते. निवडणुकीची जबाबदारी देखील महसूल विभागामार्फत यशस्वीपणे पार पाडली जाते. एकूणच राज्यातील नागरिकांच्या भविष्य, भवितव्य आणि कल्याणाची मोठी जबाबदारी हा विभाग सांभाळत असून ती चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post