राष्ट्रवादीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी


। अहमदनगर । दि.22 जुलै 2023 । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीने नगर शहरातील राजकीय वातावरणाला कलाटणी मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कळमकर यांच्याकडे पाहिले जाते.

शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश
अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर यांच्यावर लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात घडलेल्या राजकीय फेरबदलानंतर शहरातील राजकीय समीकरणेही बदलत आहेत.

अभिषेक कळमकर हे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. महापौरपद भूषविल्यानंतर ते विधानसभेसाठी इच्छुक होते. महापौरपदाच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामांना प्राधान्य देऊन शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे मार्गी लावण्यावर भर दिला.


गेल्या काही दिवसांपासून आ. जगताप व माजी महापौर कळमकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरूच आहे. आता राज्यातील राजकीय घडामोडींमुळे त्यांनी मोठ्या साहेबांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक  कळमकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post