कचर्‍याच्या घंटागाड्या फिरल्या, काँग्रेसची बोंबाबोंब झाली स्थगित

। अहमदनगर । दि.07 मार्च । मनपाच्या कचरा संकलनासाठीच्या घंटागाड्या फिरत नसल्याचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसने सोमवारी बोंबाबोंब आंदोलनाचा व सायंकाळी कचर्‍याची होळी करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सोमवारी सकाळी शहराच्या विविध भागात घंटागाड्या फिरून त्यांनी कचरा संकलन सुरू केले. त्यामुळे काँग्रेसने बोंबाबोंब आंदोलन स्थगित करून सायंकाळची कचर्‍याची होळीही रद्द केली. दरम्यान, काँग्रेसच्या बोंबाबोंब आंदोलनाच्या इशार्‍यानंतर शहरात दुपारनंतर घंटागाड्या प्रगट झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

सुमारे दोन आठवड्यांपासून शहराच्या बहुतांशी भागांमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नव्हत्या. यावरून काँग्रेसच्यावतीने मनपाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून बोंबाबोंब आंदोलन करण्याचे जाहीर आले होते. तसेच कचर्‍याच्या होळीचे सायंकाळी सावेडी उपनगरामध्ये नियोजन केले होते. मात्र, काँग्रेसच्या आंदोलन इशार्‍यानंतर शहरात होळीच्या दिवशी दुपारनंतर
घंटागाड्या फिरू लागल्या व कचरा संकलन करू लागल्या.

त्यामुळे काँग्रेसने आंदोलन स्थगित केले.अनेक भागांमध्ये घंटागाड्या खूप दिवसानंतर आल्यामुळे महिलांनी, नागरिकांनी घंटागाड्यांवर असणार्‍या चालक, मदतीस यांना चांगलेच फैलावर घेतले. नागरिकांच्या रोषाला सामोरे जात असताना ठेकेदाराच्या प्रतिनिधींची यावेळी बोबडी वळाली. आता इथून पुढे
रोज घंटागाडी येईल, असे सांगत सारवासारव यावेळी त्यांनी केली, असा दावाही काळे यांनी केला.
घरात साचलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीने महिलांसह सर्वच नागरिक हवालदिल झाले होते. त्यामुळे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिक देखील यात मोठ्या संख्येने सहभागी होणार होते. 

मात्र ठेकेदाराला शहाणपण सुचले असून होळीच्या दिवशी दुपारनंतर उशिराने का होईना पण घंटागाड्या शहराच्या वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आल्यामुळे काँग्रेसने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान, ज्या भागांमध्ये घंटागाडी नियमितपणे येत नाही अशा परिसरातील नागरिकांनी काँग्रेसच्या 9028725368 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post