। अहमदनगर । दि.25 मे । सोशल मिडियातून व्हायरल होणार्या बाबींकडे पोलिसांनी आता बारीक लक्ष देणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरवणुकीत हातात तलवार घेऊन नाचणारांचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर त्याची दखल घेऊन कोतवाली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आता महामार्गावर वाहने आडवी लावून रहदारीस अडथळा निर्माण केल्याच्या व्हीडीओवरून आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे लग्न समारंभातील हळदी कार्यक्रमाच्यावेळी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणार्या 11 जणांविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक शफी जानसाब शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मझन मिर्झा, मोहम्मद जिशान जहागीरदार, सोहील शेख,
अशरफ नदीम जहागीरदार, सलमान शेख, रझन कुरेशी, अझीम शीमलावाला, इझान शेख, कलिम सादिक जहागीरदार (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दि.18 मे, 2022 रोजी नगर औरंगाबाद रोडवरील अशोका हॉटेलसमोर ही घटना घडली. 18 मे रोजी रात्री 10 वाजता या लोकांनी हळदी कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी न घेता अशोका हॉटेल येथे गर्दी जमा केली. यातील टवाळखोर लोकांनी रहदारीच्या महामार्गावर स्वतःची वाहने आडवी उभी करून महामार्गावरून येणार्या जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण केला.
तसेच या ठिकाणी फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला आणि धिंगाणा घालून लोकांना जाणीवपूर्वक त्रास होईल असे वर्तन केले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक बी. एस. म्हस्के करीत आहेत.
------------------
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित