। नवी दिल्ली । दि.29 एप्रिल । देशाच्या सर्वत्र भागात पसरत असलेली उष्णतेची लाट पुढील पाच दिवसांत तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उष्माघाताने माणसांची लाही-लाही होणार असे चित्र आहे.
आयएमडीने राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आणखी दोन अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
गुरुवारी (28 एप्रिल)रोजी जारी केलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील पाच दिवस वायव्य आणि मध्य भारतात पुढील तीन दिवसांत उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IMD ने म्हटले आहे की उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित भागात असुरक्षित लोकांसाठी - लहान मुले, वृद्ध आणि जुनाट आजार असलेल्या लोकांसाठी "मध्यम" आरोग्याची चिंता होऊ शकते. "म्हणून या प्रदेशातील लोकांनी उष्णतेचा संपर्क टाळावा, हलके आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावे आणि टोपी, छत्री इत्यादींनी डोके झाकावे," असे त्यात म्हटले आहे.
