। अहमदनगर । दि.25 एप्रिल । जिल्ह्यात आधुनिक सुविधांसह सुसज्ज असलेल्या ३६३ शाळा फाईव्ह स्टार ठरल्या आहेत, त्यापैकी उत्कृष्ट ३८ शाळांची निवड करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सल्लागार बैठकीत देण्यात आले. त्यापैकी पहिल्या १४ शाळांची नावे, राज्यस्तरावर पाठवण्यात येणार आहेत.
मुख्यकार्यकारी अदिकारी संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी एक वाजता सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यातील ५ हजार ३१३ शाळांपैकी ४ हजार ७०३ शाळांनी शाळासिद्धी स्वयंमुल्यमापन केले असून उर्वरीत ६१० शाळांना तातडीने ते पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी प्रथम कोणत्या शाळेला प्राधान्य द्यावे यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाईल. यासाठी जामखेड गटशिक्षणाधिकारी व सर्वशिक्षा अभियानाचे उपशिक्षणाधिकारी, लिपिकांनी प्राधान्यक्रमाची पडताळणी करून गुणदान तक्त्याच्या आधारे खोल्यांसाठी प्राधान्यक्रम यादी तयार करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आली.
जिल्ह्यात डिजिटल तसेच निकषपूर्तता केलेल्या ३६३ शाळा फाईव्ह स्टार ठरल्या आहेत. त्यापैकी उत्कृष्ट ३८ शाळांची निवड होईल. पहिल्या १४ शाळांची नावे राज्य स्तरावर पाठवण्यात येतील. ही संपूर्ण माहिती स्वच्छ विद्यालय व ऑनलाईन अॅपवर १५ मे पर्यंत भरण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.
