। कोल्हापूर । दि.14 मार्च । महालक्ष्मी आणि ज्योतिबाच्या लाखो भाविकांसाठी खुशखबर आहे. दर्शनासाठी लागू केलेली ई-पासची अट रद्द झाली आहे. त्यामुळे भाविकांना थेट दर्शन घेता येणार आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे 7 ऑक्टोंबर 2021 पासून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ऑनलाईन ई-पास सुविधा सुरू केली होती. त्यामुळे मंदिरात थेट दर्शन घेता येत नव्हते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून ई- पास घ्यावा लागत होता.
परंतु आता कोरोनाची निवळलेली परिस्थिती, भाविकांची होणारी गैरसोय आणि येणार्या तक्रारी लक्षात घेऊन दर्शनासाठी असलेली ऑनलाइन ई-पासची अट आता रद्द केली आहे, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे यांनी सांगितले.
कोविड काळात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते. त्यात दर्शनासाठी ई- पासची सुविधा सुरू केली होती. परंतु आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची पद्धत बंद केली आहे, असे समितीने म्हटले आहे. यामुळे भाविकांना आता महालक्ष्मी आणि जोतिबाचे थेट दर्शन घेता येणार आहे
Tags:
Maharashtra