बालविवाह रोखण्यासाठी सरपंचांना प्रशिक्षित करा : रूपाली चाकणकर

 


। कोल्हापूर । दि.14 मार्च । बालविवाह ही गंभीर समस्या असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देऊन कायद्याअंतर्गत त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत जनजागृती करावी. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलिस, महिला व बालविकास विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस विभागाची बैठक झाली. या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला व बाल विकास विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राला भेट देऊन कामाची माहिती घेतली.

चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या आहे. बालविवाहामुळे माता मृत्यू, बाल मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बालविवाहाच्या घटना वेळीच रोखणे आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. 

या घटना रोखण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असून अशा घटना आढळल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरून कारवाई करावी. बालविवाहाच्या घटना घडू नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. तसेच यासाठी इतर उपाययोजना करता आल्या तर त्या देखील कराव्यात, अशा सूचनाही चाकणकर यांनी या वेळी बोलाताना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post