अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती : तांबे


। अहमदनगर-संगमनेर । दि.22 मार्च । अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महत्वपूर्ण माध्यम आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना सध्या मिळत असलेली शिष्यवृत्ती अत्यंत तुटपुंजी असून त्यात भरीव वाढ होणे गरजेचे आहे. सध्याच्या २५ हजार रुपये शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करून ती ५० हजार रुपये करावी, अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली. मागणीला सरकारकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पसंख्यांक विद्यार्थी आणि शिक्षण विभागातील विविध प्रश्नांबाबत मागणी करताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, शिक्षण क्षेत्रावरील खर्च सरकारने वाढवला पाहिजे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती उच्च शिक्षण व अन्य शिक्षणासाठी अडचणीची ठरते आहे. यासाठी शिष्यवृत्तीत शासनाने भरीव वाढ करुन ती ५० हजार रुपये करावी. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाय योजना कराव्यात. विविध संस्थांचे अनुदान बंद आहे, ते तातडीने सुरू करावे. अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सरकारला केली. 

अल्पसंख्यांक राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आमदार डॉ. तांबे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुपटीने म्हणजे ५० हजार रुपये वाढ करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब आदिवासी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार डॉ. तांबे यांचे राज्यातील विद्यार्थी व पालक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post