शेतकर्‍यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड आंदोलनात : डॉ.शिवानंद भानुसे

शेतकर्‍यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड आंदोलनात

एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन

। औरंगाबाद । दि.18 मार्च । शेतकर्‍यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड आंदोलनात या ब्रीदवाक्या नुसार आता संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात दि.19 तारखेला हे नियोजीत केले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

भानुसे पुढे म्हणाले की, दि.19 मार्च 1986 बुधवार रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली. ज्याची शासन दरबारी अधिकृत नोंद आहे ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावातील सामाजिक व संत विचारांचे शेतकरी स्मृतीशेष साहेबराव पाटील करपे यांनी त्या दिवशी आपली पत्नी व चार लेकरांसह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर  कुष्ठधामात सामुहिक आत्महत्या केली.

शासनाची शेतकरीविरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात झालेली विदारक अवस्था हेच त्या सामुहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. तेव्हापासून आजतागायत शेतकरी आत्महत्यांची मालिका देशभरात सुरुच आहे.चार लाखांपेक्षा जास्त शेतकरी यांनी मागील काही वर्षात चुकीच्या सरकारी धोरणामुळे आपले आयुष्य संपविले आहे.

शेतीसोबत निगडीत असलेल्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करणे हे प्रत्येक संवेदनशील व विचारी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षक कायद्यांचा विरोध करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी आपण सर्वजण 19 मार्चला अन्नत्याग/उपवास/उपोषण करणार आहोत.

एक दिवस आम्ही उपवास केल्याने सरकार नावाच्या कठोर व मुर्दाड व्यवस्थेला काहीही फरक पडणार नाही.कोणीही आमदार,खासदार,मंत्री यांच्या संवेदना जागृत होणार नाही याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे.तरीसुद्धा आम्ही उपवास करतोय, कारण याने तुम्हाला नाही तर आम्हाला फरक पडणार आहे. शेतकर्‍यांच्या वेदनेशी जोडून घेण्याचा आणि त्याच्या संकटात सोबत राहण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केलेले उपाय फक्त सैध्दांतिक असून चालणार नाही तर ते व्यवहारात सुध्दा उतरले पाहिजे.त्यामुळे शेतकरी आत्महत्यांना कारण ठरलेल्या नरभक्षी कायद्यांचा निषेध करण्यासाठी व शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आपण एक दिवसाचा अन्नत्याग करावा ही सर्व बळीपुत्रांना आग्रहाची विनंती असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशप्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post