। अहमदनगर-श्रीगोंदे । दि.19 मार्च । नैतिकता आणि सहकाराची सांगड घालून सहकारात निकोप स्पर्धा होऊन लोकांना सहकारातून समृद्धी घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
पुणे येथे राष्ट्रीय सहकारी विकास निगम दिल्लीच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट सहकार पुरस्कार श्रीगोंदे येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीला देताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते.
आर्थिक क्षेत्रात गेल्या १० वर्षात विठ्ठलराव वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटीमार्फत विविध कर्ज योजना, बचत गटांना कर्जवाटप शिवाय बँकिंग क्षेत्रात उत्पन्न वाढीचे विविध मार्ग शोधून तसेच सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केल्याबद्दल मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटीला जाहीर झाला.
पुरस्कार विठ्ठलराव वाडगे यांना बुधवारी सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य सहकारी विकास महामंडळाचे लेफ्टनंट कर्नल विनीत नारायण, डॉ. अभय देशपांडे, नाबार्डचे जी. एस. रावत यांच्या हस्ते पुणे येथे एका सोहळ्यात देण्यात आला. कवडे म्हणाले, राज्यात सहकारात क्रांती झाली त्याचे जतन करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
रावत यांनी सहकार, सहकारी बँकांमार्फत सुमारे दीडशे योजना राबविल्या जातात. त्यासाठी संस्थांनी प्रामाणिक काम केल्यास शेवटच्या घटकापर्यंत सहकाराचा फायदा पोहोचेल, यासाठी संस्था चालकांनी जागरूकतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठलराव वाडगे, रुक्मिणी वाडगे, सायली वाडगे, अजय गावडे, शरद गावडे, वृद्धेश्वर मल्टिस्टेट सचिव अॅड. शंकरराव गडगे, अॅड. विशाल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र म्हस्के, लेखाधिकारी रघुनाथ डफळ, प्रदीप आठरे, किसन आघाव, सुधाकर वांढेकर, ईश्वर जंजिरे आदी उपस्थित होते.