। अहमदनगर । दि.05 मार्च । नगर शहरात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, खून, अत्याचार, भूमाफिया, दरोडे या घटना घडत आहेत. याविरोधात शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात राजकीय वरदहस्त असणार्या गुंड प्रवृत्तींकडून दिवसाढवळ्या कायदा हातात घेऊन विविध प्रकारचे गंभीर गुन्हे या लोकांकडून घडत आहेत. पोलिस फक्त कारवाईविना बघ्याची भूमिका घेत आहेत. राजकीय कार्यकर्त्यांकडून बलात्कार, खून, बायोडिझेल, अवैध व्यवसाय, चोर्या, दरोडे आदि गुन्हे घडत आहेत.
तसेच दिवसाढवळ्या राजरोसपणे मटका दारु तसेच इतर व्यवसाय तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु आहेत. याच ठिकाणाहून शाळकरी मुले व्यसनाधीन होत आहेत. ही व्यसनाधीनता गुन्हेगार निर्माण करीत आहे. दिवसाढवळ्या गुन्हे करुन राजरोसपणे फिरत आहेत. त्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित व्हावी व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Tags:
Ahmednagar