धान उत्पादक शेतकर्‍यांचे शिल्लक 600 कोटी तत्काळ वितरितकरणार : उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती


। मुंबई  । दि.22 मार्च । धान उत्पादकांचे थकीत असलेले 600 कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून धान खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत शेतकर्‍यांच्या बोनसची मागणी केली. सरकारने धान खरेदी सुरु केली आहे, शेतकर्‍यांना आधारभूत किंमत मिळत आहे.

मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी  सदस्य वैभव नाईक यांनी केली. तर राज्यात सन 2013 पासून शेतकर्‍यांना धान खरेदीवर बोनस देण्याची पद्धत सुरू आहे.

ती कायम ठेवावी अशी मागणी  विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर मागील धान खरेदीपोटीचे शेतकर्‍यांचे शिल्लक 600 कोटी रुपये लगेच देण्यात येतील असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

मात्र बोनसची मागणी मान्य करता येणार नाही यातून केवळ शेतकर्‍यांची फसवणूक होते. शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसड राज्यातील व्यापारी राज्यात येऊन शेतकर्‍यांच्या नावाने धान विकून बोनस घेऊन जातात. राज्यातील शेतकर्‍यांना त्याचा फारसा फायदा होत नाही.

त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकर्‍यांना त्यांनी धानाची लागवड केल्याच्या प्रमाणात काही प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post