माजी सैनिकाची ऑनलाईनद्वारे झाली 18 लाखाची फसवणूक


। अहमदनगर । दि.15 जानेवारी । राहाता तालुक्यातील लोणी येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या माजी सैनिकाने येथील सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. फेसबुकवर चॅटिंग करताना फिर्यादी यांची एका महिलेशी ओळख झाली. तिने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीची उत्पादने विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.

पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतू,10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले.

त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना दिनाक 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली. फिर्यादी यांची एकुण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post