राज्यभरातील प्रमुख बांधकाम व्यावसायिक नगरला येणार

। अहमदनगर । दि.22 सप्टेंबर । राज्यभरातील 60 शहरांतील अडीचशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स येत्या 25 रोजी नगरला येणार आहेत. त्यांच्यात बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा व विचारांचे आदानप्रदान होणार आहे. बांधकाम क्षेत्रात देशपातळीवरील प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक जनरल बॉडी मिटिंग 25 सप्टेंबर रोजी नगरमध्ये आयोजित करण्यात आली असून, यानिमित्ताने राज्यभरातील प्रमुख बांधकाम व्यावसायिक नगरला येणार आहेत.

क्रेडाई ही बांधकाम व्यवसायिक व डेव्हलपर्सची देशपातळीवरील नामांकित संघटना आहे. क्रेडाईच्या सभासदांचे प्रकल्प हे विश्वसनीय आणि दर्जेदारपणासाठी नावाजले जातात. करोना महामारीच्या काळात बांधकाम क्षेत्रावरही मोठे परिणाम झाले आहेत. त्यादृष्टीने समग्र विचारमंथन व्हावे, शासन दरबारी विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणे, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलांची सर्वांना माहिती व्हावी तसेच राज्य संघटनेच्या भविष्यातील कामकाजाचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे.

राज्याच्या बैठकीचे संचालन करण्याची संधी क्रेडाई अहमदनगरला मिळाली असून नगर शाखेचे 100 हून अधिक पदाधिकारी, सदस्य यात सहभागी होतील. या बैठकीसाठी मुख्य प्रायोजक म्हणून महाराष्ट्रातील अग्रेसर व विश्वसनीय असलेले आयकॉन स्टील (जालना) आणि केनेस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. तर शिंडलर, एचडीएफसी लिमिटेड, होम फर्स्ट, आबेदीन पेंटस, कोनेट इस्टेट हे सहप्रायोजक आहेत. बैठकीचे नगर क्रेडाईने परिपूर्ण नियोजन केले असून राज्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक एकत्र येणार असल्याने नगरमधील व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास मदत होणार असल्याचे क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा व सचिव अमित वाघमारे यांनी सांगितले.

या बैठकीच्या यशस्वीतेसाठी संजय गुगळे, आशिष पोखरणा, गिरीश आगरवाल, सागर गांधी, नितीन गुगळे, प्रसाद आंधळे, दीपक बांगर, राहुल अडसुरे, प्रकाश मेहता, सचिन कटारिया, कमलेश झंवर, राजेंद्र पाचे, संजय पवार, विक्रम जोशी, संजोग गुगळे, अ‍ॅड. सचिन कटारिया, गौरव पितळे, शिवांग मेहता, मयूर राहिंज, नितेश गुगळे, तुषार लोढा आदी परिश्रम घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post