पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर

। अहमदनगर । दि.22 सप्टेंबर ।  पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या 6 हजार 249 गोण्यांची आवक झाली आहे. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याला 400 रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या अनेक लिलावांच्या तुलनेत हा विक्रमी भाव मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे.

पारनेर येथील बाजार समितीत आज (बुधवारी) कांद्याच्या सहा हजार 249 कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 2200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात चारशे रुपयांनी वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आता शेतकर्‍यांना लागली आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1900 ते 2200,  दोन नंबर कांदा ः 1300 ते 1800, तीन नंबर कांदा ः एक हजार ते 1200, चार नंबर कांदा ः 200 ते 900. आज झालेल्या लिलावामध्ये एक व दोन नंबर कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. तीन व चार नंबर कांद्याचे भाव मागील लिलावा प्रमाणेच होते. त्यात काहीच वाढ झालेली नाही.

शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व संचालक मंडळाने केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post