। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । पाथर्डी शहरातील उपनगरातील एका इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी बोगस दाखले व इतर कागदपत्रे बनवून देणार्या दोघांना नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून नाशिक देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या इंटेलिजन्सच्या अधिकार्यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली होती.
गुरुवारी (दिनांक 9) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी विनायक मासळकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मारुती आनंदराव शिरसाठ (रा.जांभळी,ता.पाथर्डी) व दत्तू नवनाथ गर्जे (राहणार अकोला) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी उशिरा सापळा लावून मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून अभी माधव सहाणे (वय 20, रा. साकुर, ता. इगतपुरी, नाशिक) यास दोन हजार रुपये देऊन पाठवले. यावेळी संबंधित व्यक्तीने त्यास पाथर्डी शहरातील नाथनगर येथील शनी चौका जवळच्या दुमजली इमारतीमध्ये नेऊन बनावट दाखला दिला.
त्यानंतर खात्री होताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून विविध संस्थांचे शिक्के, बनावट दाखले आदीसह विविध कागदपत्रे व साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी मारुती शिरसाठ, दत्तू गर्जे यांच्यासह कुंडलिक दगडू जायभाय (रा. अनपटवाडी, ता.पाटोदा), मच्छिंद्र कदम (रा.मानूर कासार), अजय उर्फ जय टिळे (रा.वाडीवरे, ता. इगतपुरी),
शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा.पिंपळद, जि. नाशिक) यांनी एकत्र येऊन संगतमताने शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार करुन तो खरा आहे असे भासवून त्याचा शासकीय कामाकरिता गैरवापर करुन, सैन्यदलात मध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत.
