। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । गणेशोत्सव काळात शासनाने सार्वजनिक गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केलेला असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रीक माध्यमाद्वारे करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
त्याप्रमाणे अहमदनगर जिल्हयातील सर्व सार्वजनिक मंडळांनी आपापल्या गणेशमूर्तीचे दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे उपलब्ध करुन देणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसह उत्सव काळातील कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हयात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये व गर्दी टाळावी. तसेच सार्वजनिक अथवा खासगी गणेश मंडळांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढू नये अशा सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
यामध्ये दोन अप्पर पोलीस अधीक्षक, 9 पोलीस उपअधीक्षक, 32 पोलीस निरीक्षक, 102 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरीक्षक आणि 2250 पोलीस अंमलदार यांच्यासह तीन आरसीपी प्लाटुन, एक एसआरपीएफ प्लाटून व होमगार्ड एक हजार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व भाविकांनी कोविड 19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करुन गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करुन पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
