मारहाणीला घाबरून गदेवाडी येथील वृद्धाची आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । शेवगांव येथे दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन गाडीमधून पळवून नेऊन वृद्धाला शिवीगाळ करीत जबर मारहाण करण्यात आली. गावगुंडाच्या या दशहतीला घाबरुन वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे घडली.

विनायक किसन मडके (वय 65 रा.गदेवाडी, ता.शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्याचा मुलगा तुळशीराम विनायक मडके (वय 30) याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव येथील गदेवाडी येथील विनायक किसन मडके हे आठ दिवसांपूर्वी घोड्यावरून आपल्या शेतात चालले असता फर्च्युनर गाडीतून जाणार्‍या मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर व मच्छिंद्र एकनाथ धनवडे (सर्व रा.गदेवाडी, ता.शेवगाव) यांनी कट मारला होता.

त्यावेळी विनायक मडके यांनी याचा जाब विचारला असता वरील तिघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी विनायक मडके हे गदेवाडी गावात गेले असता पुन्हा या तिघांनी त्यांना दारुसाठी पैसे मागितले. विनायक मडके यांनी त्यांना पैसे न दिल्याने शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

विनायक मडके हे घरी आल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर दि.9 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आरोपी मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे यांनी फर्च्युनर गाडी (क्रमांक 2223) मधून येऊन विनायक मडके यांना हाका मारुन घरातून बोलावून घेतले.

ते गाडीजवळ येताच त्यांचा घातपात करण्याच्या उद्देशाने त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले. त्यावेळी विनायक मडके यांचा मुलगा तुळशीराम मडके याने प्रतिकार केला असता त्यालाही शिविगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी या तिघांनी तुझ्या वडीलांना आज जीवे सोडत नाही, असे म्हणुन दमदाटी करून घेऊन गेले.

त्यानंतर विनायक मडके यांचा शोध घेतला असता सुयोग हॉटेल समोर मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे हे तिघे विनायक मडके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत होते. दरम्यान हे पाहुन तुळशीराम मडके याने भावाला फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी शोध घेतला विनायक मडके यांनी हॉटेल सुयोगच्या पाठीमागे असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांना खाली उतरून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.याप्रकरणी तुळशीराम विनायक मडके (वय 30 रा. गदेवाडी, ता.शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर व मच्छिंद्र एकनाथ धनवडे (सर्व रा.गदेवाडी,ता. शेवगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post