मराठा आरक्षण : संभाजीराजे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपती यांची भेट

। नवीदिल्ली । दि.03 सप्टेंबर । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सर्वपक्षीय नेत्यांच्या एक शिष्टमंडळासह भेट घेतली.

त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपती कोविंद यांच्यापर्यंत पोहोचवल्या .

यावेळी खासदार संभाजी राजे यांच्यासह शिष्ठमंडळाने राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात आले. मराठा समाजाची स्थिती, त्यांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच आदी बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली. संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले.

त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post