। अहमदनगर । दि.22 सप्टेंबर । नगर तालुक्यातील पोखर्डी येथील गावचे सामाजिक नेतृत्त्व असलेले स्व. दत्तात्रय महादु ढवळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी यांचे वय 88 वर्षे होते. स्व.दत्तात्रय ढवळे यांचा जीवन प्रवास हृदयस्पर्शी आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, व्यापार, धार्मिक आदि क्षेत्रात भरीव असे योगदान राहिले आहे.
ते धार्मिक वृत्तीचे आणि मनमिळावू, शांत, संयमी स्वभावाचे होते. पोखर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ते चेअरमन होते. अनेक वर्ष त्यांनी पोखर्डी येथे स्वस्त धान्य (रेशन) दुकान चालविले. गावातील सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणे, मंदिरांची उभारणी, यात्रा, हरिनाम सप्ताह अशा धार्मिक कार्यामध्ये मोलाची भूमिका असायची.
गावातील तंटे गावातच मिटविणे. गावात एकोपा निर्माण करणे आदी कामे त्यांनी प्रभावीपणे केली आहेत. नुकतेच पोखर्डी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील व तालुक्यातील मान्यवर, नातेवाईक व्यक्ती उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, सुन, नात-नातु असा मोठा परिसर आहे. पोखर्डीचे माजी सरपंच मा.गोरक्षनाथ ढवळे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने परिसरात व तालुक्यात हळहळ व दुःख व्यक्त होत आहे.
