। अहमदनगर । दि.02 सप्टेंबर । नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष शाखेच्या पोलिसांनी अटक करण्याची कारवाई मदडगाव येथे केली.
याबाबतची माहिती अशी की, दि.18 जून 2019 रोजी अतुल अभिमन्यु आठरे (रा.मदडगाव ता.जि. अहमदननगर) याने पिडीत अल्पवयीन मुलीस चिंचोडी पाटील (ता. जि.नगर) येथून फूस लावून पळवून नेले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो दि.18 ऑगस्ट 2021 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार एस. बी. कांबळे करीत होते. या शाखेचे अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व मोबाईल लोकेशन, गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली.
मंगळवारी दि. 31ऑगस्ट रोजी यातील पिडीत मुलगी व आरोपी हे मदडगाव (ता.जि.नगर) येथे आल्याबाबतची माहिती गुप्त बातमीदारामार्फत कक्षास मिळाली. या माहितीवरुन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक गावित यांच्या आदेशाने मदडगाव येथे जाउन यातील पिडीत मुलगी व आरोपीस ताब्यात घेतले.
हा गुन्हा 14 दिवसात उघड केला असून गुन्हा पुढील तपासकामी मूळ कागदपत्रांसह नगर तालुका पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक एम. के. घुटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल सी.टी.संधवन व चालक पोलिस कॉन्स्टेबल एस.एस. काळे यांनी केली.
