चोर्‍या रोखण्यासाठी आता नागरिकही गस्तसाठी रस्त्यावर!

 । अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । श्रीरामपूर व परिसरात सध्या चोरांचा धुमाकूळ सुरु असून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता थेट काही भागात नागरिक स्वतः रात्री गस्त घालीत आहेत.

बेलापूर गावातील शेतकरी शाम पुजारी हे तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयाच्या आवारातील पार्किंग मध्ये हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल लावली. मात्र काम आटोपल्यानंतर ते पार्किंगमध्ये आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

असे असूनही चोरट्यांनी मोटारसायकल चोरली. दुसरी घटना टाकळीभान गावात घडली आहे. भोकर शिवारात पत्रकार चंद्रकांत दादासाहेब लांडगे यांचे फर्निश प्लाझा नावाने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. रात्री दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरांनी दोन टिव्ही, दोन होम थिएटर असा 42 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

शहरानजिक असलेल्या बोंबले नगरमधील रहिवाशी प्रा. सदाफुले यांचे घरावर दरोडा पडला. यानंतर सतत आठ दिवस दरोडेखोर या भागात येत आहेत. गॅस व वायर कटरचा वापर करून दरवाजे तोडले जात आहेत. या दहशतीमुळे नागरिक रात्रभर जागे असतात.

Post a Comment

Previous Post Next Post