‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दणाणला

 ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दणाणला

श्री विशाल गणपतीची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महापूजा


। अहमदनगर । दि.10 सप्टेंबर । नगरचे ग्रामदेवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील व सौ.मिनल पाटील यांच्या हस्ते महापूजा करत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यंदा मंदिरात कोविड नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला.

शुक्रवारी सकाळी महापूजेसाठी मंदिराचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज आदींसह विश्वस्त उपस्थीत होते. गणेश भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे.

नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदीर येथे आकर्षक विद्युत रोषणाईने मंदीर सजवले आहे. यावर्षी विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने साध्या पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

मनसेच्यावतीने शाडू मातीच्या श्रीगणेशाचे मोफत वितरण
श्री गणेश ही अद्यदेवता असून, महाराष्ट्रासह जगभर श्रीगणेशाची आज प्रतिष्ठापना होत आहे. परंतु श्री गणेशाची मुर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जातात, त्या पर्यावरणासाठी घातक असल्याने नागरिकांनी शाडू मातीच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावी.मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होण्यासाठी जनजागृती करुन नागरिकांना श्रीगणेश मूर्तीचे व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. यासाठी शाडू मातीच्या गणपतीचे वितरणही गेल्या 4-5 वर्षापासून केले जात आहे. यंदाही लकी ड्रॉ पद्धतीने भाविकांना शाडू मातीच्या श्रीगणेशाचे मोफत वितरण केले आहे. या उपक्रमांमुळे भाविकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने 101 नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेश मुर्ती लकी ड्रॉ पद्धतीने मोफत देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, प्रकाश गायकवाड, संकेत जरे, ओंकार काळे, स्वप्निल वाघ, राजू लाळगे उपस्थित होते.

नगरकरांकडूनही गणरायांचे जल्लोषात स्वागत
यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे संकट आहे. सरकारने उत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालन करत गणेश मंडळे आणि घरगुती गणेशाचे स्वागत करण्यात आले. आगमन मिरवणूकांना बंदी असल्याने गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला.

भाविकांची बाजारपेठेत गर्दी

यंदा गणेशमूर्ती व पूजा साहित्याच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र उत्साहात कुठेही कमी नव्हती. शहरातील माळीवाडा, दिल्लीगेट पाईपलाईन रोडला भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी चौक, श्रीराम चौक, एमआयडीसी भागात नागापूर परिसरात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post