। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्य सरकारचे वतीने शेतकर्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात येत आहे. दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत या योयजनेमध्ये सहभागी होऊन शेतकर्यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी त्वरीत भूविकास बँकेमध्ये भरावी आणि आपला 7/12 उतारा कोरा करुन घ्यावा असे आवाहन दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अहमदनगर यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा यासाठी योजनेला दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देऊन योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
एकरकमी कर्ज परतफेड योजना ही योजना थकबाकीदार शेतकर्यांसाठी शेवटची संधी म्हणून सरकार ही योजना राबवित आहे. अहमदनगर जिल्हा भूविकास बँकेचे सादर योजनेसाठी एकुण 241 सभासद एकरकमी कर्ज परतफेड योजनेसाठी पात्र असून या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा. बँकेच्या थकबाकीदार 241 सभासदांचा प्रचलित हिशोब साधारणपणे 422.47 लाख होत असून एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार
त्या सभासदांना 222.00 लाख एवढी रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजेच त्यावर सभासदांना 200.47 लाख एवढी भरघोस सवलत मिळणार आहे. तरी भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचेकडील थकबाकी बँकेच्या अहमदनगर येथील जुनी कोर्ट गल्ली, भूविकास भवन, पटवर्धन वाडा येथील मुख्या कर्यालयाशी 0241-2345333 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
