। अहमदनगर । दि.06 सप्टेंबर । महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी व जवळ बाळगण्यासाठीही प्रतिबंधित असलेला गुटका व सुगंधी तंबाखूचे अनेकविध प्रकार सर्रास उपलब्ध होऊ लागले आहेत. याविरोधात पोलिसांच्या धडक कारवाई सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नुकतीच कारवाई करीत 15 लाख 62 हजाराचा गुटका व तंबाखूसह पाचजणांना अटक केली. ही कारवाई दौंड रोडवरील अरणगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली.
शेख नासिर अहमद चाँदमिया (44, भिंगार), शेख अय्याज नसीर (39, भिंगार), आबेद नासीर शेख (34, रा. नागरदेवळे), सय्यद असीद महेमूद (42, भिंगार), सादिक खान इमाम पठाण (48, नेवासे) व शेख नूर अब्दूल रऊफ (फरार), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बाहेरच्या जिल्ह्यातून दोन टेम्पोमध्ये गुटखा व तंबाखू विक्रीसाठी नगरला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. कटके यांनी पथक पाठवून दौंड रोडवरील अरणगाव शिवारात गुटख्याचे दोन्ही टेम्पो पकडले. हिरा कंपनीचा गुटखा व रॉयल कंपनीची तंबाखू, दोन टेम्पो तसेच दोन दुचाक्या असा एकुण 15 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सापळा रचून पकडले
या कारवाई बाबतची माहिती अशी कि, शनिवार (दिनांक 4) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली कि, अशोक लेलँड व टेम्पोमधून काहीजण हे दौंड ते अहमदनगर रोडने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटका विक्री करण्यासाठी घेवून अहमदनगर शहराच्या दिशेने येत आहेत. आता लागलीच नगर-दौड रस्त्यावरील अरणगाव चौक या ठिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन पंचांसह खासगी वाहनाने अरणगाव चौक या ठिकाणी जावून सापळा लावला..ही कारवाई करण्यात आली.
