सराईत गुन्हेगार अटकेत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कर्नाटकमध्ये दरोडा टाकून निर्घृण हत्या केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद


। अहमदनगर । दि.28 ऑगस्ट ।  कर्नाटक राज्यातील कलादगी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकून व खून करुन फरार झालेला औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास वाकोडी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. संतोष नंदू भोसले (रा. बीडकीन, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील कलादगी पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपींनी दरोडा टाकून एका मुलीची हत्या करुन व एका वृध्द इसमास गंभीर जखमी करत 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व 25 हजार रुपये रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत कलादगी पोलीस ठाणे, कर्नाटक राज्य येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर

कर्नाटक पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे कुलकर्णी रामू चव्हाण, रा. बीडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद यास अटक केेली आहे. परंतु, आरोपीचे इतर साथीदार हे फरार झाले होते. सदर फरार आरोपींची माहिती कर्नाटक पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना कळविल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे फरार आरोपींचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेऊन जिल्ह्यामध्ये शोध घेत होते.

वरील नमूद गुन्ह्यात फरार असलेला आरोपी संतोष नंदू भोसले, रा. बीडकीन हा वाकोडी फाटा, ता. नगर येथे त्याच्या सासूरवाडीस लपूनछपून राहात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, संदीप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने चालक पोहेकॉ उमाकांत गावडे यांनी सलग दोन दिवस सापळा लावून

आरोपी संतोष नंदू भोसले यास ताब्यात घेतले.  त्याचेकडे वरील नमूद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत माहिती दिल्याने त्यास पुढील तपास कामी कलादगी पो. स्टे. जि. बागलकोट, कर्नाटक राज्य येथील पोलिसांचे ताब्यात देण्यात आलेले आहेत. आरोपी संतोष भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये खून, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post